पत्नीचा गळा आवळून सदोष मनुष्यवध; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास
सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.
जालना, दि. 28 : पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी आरोपी गजानन हरिभाऊ कावळे (रा. भाटेपुरी, ता. जि. जालना) याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी आरोपी गजानन कावळे हा दारूच्या नशेत आपल्या भाटेपुरी येथील घरी आला होता. त्यानंतर त्याचे पत्नी वंदना कावळे यांच्याशी वाद झाले. या वादातून आरोपीने पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याचा आरोप होता.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. डॉ. दिपक नारायणराव कोल्हे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेला साक्षीपुरावा, वैद्यकीय अहवाल तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी आरोपी गजानन हरिभाऊ कावळे यास भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 (भाग-2) अंतर्गत दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. डॉ. दिपक नारायणराव कोल्हे यांना सेशन कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार तसेच जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


