जालना बसस्थानकाजवळील सीना नदीचे पात्र रुंदीकरण सुरू
गतवर्षीच्या महापुरानंतर प्रशासनाची मोठी कारवाई; पूरस्थिती टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम
जालना : गतवर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे शहरातील सीना नदीला आलेल्या महापुराने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः जालना बसस्थानक परिसरात नदीचे पाणी रस्त्यावर व व्यापारी भागात शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता सीना नदीचे पात्र मोठे करण्याच्या कामाला गती दिली असून सध्या युद्धपातळीवर नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम सुरू आहे.
महापूराच्या वेळी नदीपात्र अरुंद असल्याने पाण्याचा वेग वाढून अनेक भाग जलमय झाले होते. बसस्थानक परिसरातील दुकाने, हातगाडे, लहान व्यवसायिक तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यानंतर स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नदीचे पात्र रुंद करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. “गतवर्षीच्या पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. आता नदीचे पात्र मोठे होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळेल,” अशी प्रतिक्रिया परिसरातील व्यापाऱ्यांनी दिली.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावर अतिक्रमण न करण्याचे आवाहन केले असून पावसाळ्यापूर्वी पूरनियंत्रणाच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.


