अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी 40 हजारांची लाच घेताना मनपा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले
पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
जालना, दि. 29 : जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील दोन कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपी भाऊलाल चापा राठोड (वय 57), प्रभारी सहायक अतिक्रमण पथक प्रमुख, तसेच श्यामसन छबुराव कसबे (वय 51), प्रभारी सहायक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख, दोघेही महानगरपालिका जालना येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर 20 मार्च 2026 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपींनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 28 मे 2026 रोजी जालना येथील जुना मोंढा परिसरातील बाबा टी हाऊस येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी श्यामसन कसबे यांनी तक्रारदाराकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुसरे आरोपी भाऊलाल राठोड यांनाही ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून 40 हजार रुपयांची लाचरक्कम जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोनही जप्त करून त्यांचे विश्लेषण सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे तसेच पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


