सोमवारपासून जालना शहरात सिटी बस धावणार
आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्याला यश
जालना, प्रतिनिधी : जालना शहरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची सिटी बस सेवेची मागणी अखेर मार्गी लागली असून, येत्या सोमवारपासून जालना शहरात सिटी बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली. शहरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची प्रवासाची गैरसोय लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यासाठी आमदार खोतकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
१७ सप्टेंबर रोजी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम व आगार प्रमुख जैवळ यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत जालना शहरासाठी सिटी बस सेवा किती महत्त्वाची आहे, शहराची वाढती लोकसंख्या, विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, बाजारपेठ तसेच औद्योगिक परिसरात दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसावत असलेली सार्वजनिक वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन सिटी बस सेवा तातडीने सुरू करण्याबाबत आमदार खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली.
या प्रश्नासाठी आमदार खोतकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी जालना तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांनंतर सोमवारपासून शहर बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गांवर धावणार सिटी बस
प्राथमिक माहितीनुसार जालना शहरात पुढील मार्गांवर सिटी बस सेवा उपलब्ध होणार आहे—
१) बसस्थानक ते नागेवाडी :
बसस्थानक – भोकरदन नाका – जालना बाजार समिती – कन्हैयानगर – गणपती नेत्रालय – जे.ई.एस. महाविद्यालय – एसआरपीएफ – मंठा चौफुली – जिल्हाधिकारी कार्यालय – मोतीबाग – विशाल कॉर्नर – एमआयडीसी – नागेवाडी, काकडे पेट्रोल पंप.
२) बसस्थानक ते रामनगर साखर कारखाना :
बसस्थानक – विशाल कॉर्नर – मोतीबाग – जिल्हाधिकारी कार्यालय – अंबड चौफुली – मंठा चौफुली – रामनगर साखर कारखाना.
३) बसस्थानक ते इंदेवाडी :
बसस्थानक – मुथा बिल्डिंग – मंमादेवी – गांधी चव्हाण – रेल्वे स्टेशन – नूतन वसाहत – अंबड चौफुली – इंदेवाडी पाण्याची टाकी.
या मार्गांमुळे शहरातील विविध भागांना तसेच शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, औद्योगिक परिसर, बाजारपेठ आणि रेल्वे स्थानकाला सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थी, महिला व कामगारांना मोठा दिलासा
शहरात नियमित व परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे अनेक नागरिकांना खासगी वाहनांवर किंवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागत होते. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची मोठी गैरसोय होत होती. सिटी बस सेवा सुरू झाल्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जालना शहराचा विस्तार होत असताना विविध भागांना जोडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरू होणारी सिटी बस सेवा नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आणि शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांचीही उपस्थिती होती.

Help