मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघड; दोन आरोपी जेरबंद

आरोपींकडून ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त; जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना : जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने जालना स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. आरोपींकडून विविध कंपन्यांच्या तब्बल १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ३० हजार रुपये आहे. या कारवाईमुळे जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यांतील मोटारसायकल चोरीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली.


दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी संतोष भाऊराव पाचरणे, रा. पानशेंद्रा, जि. जालना यांनी आपली शाईन मोटारसायकल कणकेश्वर मंदिर परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८९/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चोरीची मोटारसायकल गणेश ऊर्फ संतोष शंकर शिंदे, रा. कालिकानगर, शिर्डी, जि. अहिल्यानगर आणि सौरभ विक्की रोजझारिओ, रा. शिर्डी, जि. अहिल्यानगर यांनी चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी शिर्डी, जि. अहिल्यानगर येथे कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी आणखी एका साथीदारासह मिळून जालना शहरातील उढाण कॉम्प्लेक्स, लक्कडकोट तसेच परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागांतून मोटारसायकली चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपींच्या ताब्यातून युनिकॉर्न, शाईन, स्प्लेंडर, सुपर स्प्लेंडर, सी.डी. डॉन आदी विविध कंपन्यांच्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
तीन जिल्ह्यांतील आठ गुन्हे उघड
जप्त केलेल्या मोटारसायकलींच्या तपासातून पोलीस ठाणे तालुका जालना, सदर बाजार, कदीम जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिन्सी, एमआयडीसी सिडको आणि परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची अंदाजे किंमत ४ लाख ३० हजार रुपये आहे.
दोन्ही आरोपींना जप्त मोटारसायकलींसह पोलीस ठाणे तालुका जालना येथे हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. चोरीच्या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सफौ. रामप्रसाद पव्हरे, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, रुस्तुम जेवाळ, इरशाद पटेल, बाबा गायकवाड, संदीप चिंचोले, धीरज भोसले तसेच चालक अशोक जाधवर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

प्रतिनिधी