ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकावर विटेने हल्ला; उपचारापूर्वीच मृत्यू
पान स्टॉलजवळील गोंधळ रोखताना घटना; आरोपी अटकेत, खुनाचा गुन्हा दाखल
ठाणे : पान स्टॉलजवळ गोंधळ करणाऱ्या इसमाला शांतता राखण्याची समज देण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यात सिमेंटची वीट मारण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दाखलपूर्वीच त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर आणि त्यांचे सहकारी सुभाषनगर, पोखरण रोड क्रमांक २ परिसरात सीआरएम मोबाईलमधून गस्त घालत होते. यावेळी एका पान स्टॉलजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आल्याने पोलिस पथक तेथे थांबले.
किसन भोईर हे लाठी घेऊन त्याच्या मागे धावले. याचवेळी आरोपीने त्यांच्या डोक्यात सिमेंटची वीट मारल्याचा आरोप आहे. वीट डोक्यात लागल्याने भोईर हे रस्त्यावर जोरात पडले.
घटनेनंतर पोलिस नाईक गंगाधर घुटे हे त्यांच्या मागे धावत गेले असता, आरोपीने सिमेंटच्या विटेने भोईर यांच्या डोक्यात मारल्याचे आणि ते जमिनीवर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, पोलीस हवालदार निलेश पवार आणि पोलीस शिपाई भोसले हे आरोपीच्या मागे बाजूच्या गल्लीत धावत गेले.
जखमी पोलिस अधिकाऱ्याला नागरिकांच्या मदतीने रिक्षातून टायटन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सीआरएम मोबाईलमधील पोलिस कर्मचारीही रिक्षाच्या मागे रुग्णालयात पोहोचले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर किसन भोईर यांना दाखलपूर्वीच मयत घोषित केले.
या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०३(१), १३२, १२१(१)(२), ११५(२) आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी राजू प्रेमकुमार वाल्मिकी (वय ३०, व्यवसाय हाउसकीपिंग, रा. गांधीनगर, पोखरण रोड क्रमांक २, नेमिनाथ ज्वेलर्सच्या वर, ठाणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Help

