भारत इराणसोबत असल्याचा संदेश देण्यासाठी मुंबईत जनआंदोलन
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १ ऑक्टोबरला आंदोलन; जालनासह मराठवाड्यातील नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्याचे विजय लहाने यांचे आवाहन
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना : भारताने इराणसोबत ठामपणे उभे राहावे, अशी भूमिका केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईत जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे हे जनआंदोलन होणार आहे.
इराणच्या प्रश्नावर भारताची भूमिका स्पष्ट असावी आणि भारताने इराणच्या बाजूने उभे राहावे, हा संदेश या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या आंदोलनात विविध भागांतून नागरिक सहभागी होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
भारताची परराष्ट्र धोरणातील भूमिका, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आणि इराणच्या प्रश्नावर भारताची भूमिका याबाबत जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन असल्याचे लहाने यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
जालना जिल्ह्यातील तसेच मराठवाड्यातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे उपस्थित राहून जनआंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विजय लहाने यांनी केले आहे.

Help

