पाहेगावजवळ अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
सेवली पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
जालना : सेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पाहेगाव गावाजवळ करण्यात आलेल्या छाप्यात देशी-विदेशी दारूसह बोलेरो वाहन असा एकूण ७ लाख ६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार सेवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहेगाव गावाजवळ एका बोलेरो वाहनातून विनापरवाना दारूची विक्री करण्यासाठी माल आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री सुमारे १०.२० वाजता पाहेगाव गावाजवळ छापा टाकला. यावेळी एमएच-३७-व्ही-४७२५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी आढळून आली.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारू आढळून आली. त्यात ‘सखु संत्रा’ लेबल असलेल्या देशी दारूच्या ४० बॉक्समध्ये एकूण १ हजार ९२० बाटल्या आढळल्या. प्रत्येक बाटली १८० एमएल असून त्याची किंमत ८० रुपये याप्रमाणे १ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
तसेच TUBORG बिअरच्या १२ बाटल्यांचा एक बॉक्स, अंदाजे २ हजार ४६० रुपये, McDowell's No.1 लेबल असलेल्या १८० एमएलच्या तीन विदेशी दारूच्या बाटल्या, अंदाजे ६३० रुपये, असा दारूसाठा पोलिसांच्या हाती लागला.
याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी, किंमत ५ लाख ५० हजार रुपये, पोलिसांनी जप्त केली. दारूसाठा आणि वाहन असा एकूण ७ लाख ६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सोनू अशोक जैस्वाल (रा. नेर, ता. जि. जालना) आणि शबीर नुर शेख (वय ३२, रा. नेर, ता. जि. जालना) यांच्याविरुद्ध सेवली पोलीस ठाणे गु.र.नं. १६१/२०२६, कलम ६५ (अ), ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोउपनि एस. एम. शेख, पोहेकॉ टी. सी. राठोड, तसेच पोलीस कर्मचारी एस. जे. जाधव, एन. डी. शिलवंत, व्ही. एल. जुमडे, एस. के. उघडे आणि पी. आर. चिरफरे यांनी केली.

Help
