नंदापूर येथे भव्य भारतमाता मंदिराचे आज लोकार्पण
राष्ट्रभक्ती आणि समतेचा संदेश देणाऱ्या वास्तूची पहिल्या टप्प्यातील उभारणी पूर्ण; भैय्याजी जोशी यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना
Published By Dainik Shubh Prabhat
On
जालना / दशरथ वाकोडे : राष्ट्रसंत ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या राष्ट्रभक्तीच्या विचारधारेतून आणि समतेच्या अधिष्ठानातून साकारत असलेल्या भव्य श्री भारतमाता मंदिर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भारतमातेच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
जालना-सिंदखेड राजा मार्गावरील नंदापूर (ता. जि. जालना) पाटीपासून उत्तरेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर, समृद्धी महामार्गालगत या भारतमाता मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता, देशाचा इतिहास आणि आधुनिक भारताची वैज्ञानिक प्रगती यांचा अनोखा संगम या मंदिराच्या वास्तुरचनेत पाहायला मिळणार आहे.
भैय्याजी जोशी यांच्या हस्ते लोकार्पण
भारत माता मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक घनशाम गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे अमृततुल्य आशीर्वचन होणार आहे.
या सोहळ्याला परिसरातील नागरिक, भाविक, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
विविध मंदिर शैलींचा अनोखा संगम
प्रसिद्ध मंदिर शिल्प अभ्यासक व ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ चंद्रप्रकाश शर्मा यांच्या संकल्पनेतून, तसेच सहाय्यक अभियंता भूषण देशमुख यांच्या तांत्रिक सहकार्याने या मंदिराची निर्मिती होत आहे. संपूर्ण देशभरातील विविध मंदिर स्थापत्यशैलींचा संगम या वास्तूमध्ये साधण्यात येत आहे.
मंदिराची एकूण उंची १०० फुटांपेक्षा अधिक असणार असून, जमिनीच्या पातळीवर सुमारे चार हजार चौरस फुटांचा भव्य सभागृह उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पाच फूट उंचीच्या भारतमातेच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
सभागृहामध्ये स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे चित्रप्रदर्शन तसेच सुसज्ज ग्रंथालय उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता राष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्यसंग्राम आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ज्ञानकेंद्र ठरण्याची संकल्पना आहे.
लाल किल्ला, कोणार्क चक्र अन् अजिंठा लेणींची झलक
भारत माता मंदिर परिसरात भारतीय स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे विविध घटक साकारण्यात येत आहेत. लाल किल्ल्याची प्रतिकृती, कोणार्क मंदिराच्या चक्राची प्रतिकृती, अजिंठा लेणींच्या कमानी तसेच दक्षिण आणि उत्तर भारतीय बांधकाम शैलीचा सुंदर मिलाफ या वास्तूमध्ये करण्यात आला आहे.
जलसमृद्धीचे प्रतीक म्हणून कमळाच्या फुलांच्या आकारातील जलसाठे उभारण्यात येत असून, भारताच्या विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक म्हणून चंद्रयान तसेच क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृतीही उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय परंपरा, इतिहास आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय या संपूर्ण प्रकल्पातून अधोरेखित होणार आहे.
एक एकर जागा विनामूल्य दान
या पावन कार्यासाठी नंदापूर येथील दानशूर ह.भ.प. जीजा उबाळे यांनी आपली एक एकर जागा विनामूल्य दान दिली आहे. त्यांच्या या योगदानामुळे भारतमाता मंदिर प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली.
सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांच्या या भव्य प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आगामी काळात प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांचे काम हाती घेण्यात येणार असून, पुढील टप्प्याचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते व्हावे, यासाठी मंदिर बांधकाम समिती प्रयत्नशील आहे.
तरुण पिढीत राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा उद्देश
तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि समाजात समतेचा संदेश सर्वदूर जावा, या व्यापक उद्देशाने भारतमाता मंदिराची उभारणी करण्यात येत असल्याचे ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी सांगितले.
“भारत प्रथम” या विचाराला केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महाप्रसादाचे आयोजन
लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील नागरिक, भाविक, राष्ट्रभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थांनी या ऐतिहासिक सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत माता मंदिर बांधकाम समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नंदापूरच्या परिसरात उभारले जात असलेले हे भारतमाता मंदिर राष्ट्रभक्ती, सामाजिक समता, भारतीय संस्कृती आणि आधुनिक भारताच्या प्रगतीचा संदेश देणारे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याने आजच्या लोकार्पण सोहळ्याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Help
