घाणेवाडीतील सौरऊर्जा प्रकल्पातून ४० लाखांची केबल चोरी; तिघे जेरबंद
चंदनझिरा पोलिसांची कारवाई; २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे फरार
जालना : प्रतिनिधी : जालना तालुक्यातील राजूर रोडवरील घाणेवाडी जलाशयाच्या पायथ्याशी उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून तब्बल ४० लाख रुपये किमतीची तांब्याची डी.सी. केबल चोरी झाल्याच्या प्रकरणाचा चंदनझिरा पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या केबलपैकी ३८ हजार ४०० रुपये किमतीचे ३२ किलो केबल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली २ लाख २५ हजार रुपये किमतीची रिक्षा असा एकूण २ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
घाणेवाडी जलाशयाच्या पायथ्याशी सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि विविध प्रकारच्या केबल शिवारातील प्रकल्पस्थळी आणून त्यांची जोडणी करण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही ऑगस्ट महिन्यात चोरट्यांनी प्रकल्पातील सुमारे ४० लाख रुपये किमतीची तांब्याची डी.सी. केबल चोरून नेली होती.
याप्रकरणी प्रकल्पाच्या सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना चंदनझिरा पोलिसांना दिल्या होत्या.
तांत्रिक तपासातून आरोपी निष्पन्न
पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू केला. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली. तपासादरम्यान सदर चोरीमध्ये रोहित भाऊसाहेब डकले (वय २४, रा. घाणेवाडी), साहीलखॉन जब्बारखॉन (वय १९, रा. संजयनगर, जालना), शेख नाजीम शेख ख्वाजा (वय ४१, रा. दुःखीनगर, जालना), शिवाजी दगडू पवार (रा. घाणेवाडी) आणि लक्ष्मण जाधव (रा. घाणेवाडी) यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी जालना शहरातील विविध ठिकाणी कारवाई करून दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी रोहित डकले, साहीलखॉन जब्बारखॉन आणि शेख नाजीम शेख ख्वाजा या तिघांना अटक केली.
पोलीस कोठडीत महत्त्वाची जप्ती
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात आरोपींकडून चोरीस गेलेल्या केबलपैकी ३२ किलो वजनाचे, ३८ हजार ४०० रुपये किमतीचे केबल जप्त करण्यात आले. तसेच चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली २ लाख २५ हजार रुपये किमतीची रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यामुळे या कारवाईत एकूण २ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दोघांचा शोध सुरू
या गुन्ह्यातील शिवाजी दगडू पवार आणि लक्ष्मण जाधव हे दोघे सध्या फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना अटक केल्यानंतर चोरीस गेलेला आणखी मुद्देमाल हस्तगत करण्यासह या प्रकरणाशी संबंधित आणखी गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगितले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, सफौ कृष्णा शिंदे, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अभिजीत वायकोस, जोहरसिंग कलाणी, पोको सागर खैरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बावस्कर आणि दत्ता वाघुंडे यांच्या पथकाने केली.

Help
