बकरी चोरी करणारा आरोपी जेरबंद; १८ गुन्हे उघडकीस
चोरीसाठी वापरलेली स्वीफ्ट कार व साहित्य जप्त; ४ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
जालना : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील दीड ते दोन वर्षांपासून बकरी चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून बकरी चोरीसाठी वापरण्यात आलेली स्वीफ्ट कार आणि चोरीचे साहित्य असा एकूण ४ लाख १ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौकशीदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल असलेले बकरी चोरीचे तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्ह्यात जनावर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांचा शोध घेऊन ते उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जनावर चोरी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला होता.
दरम्यान, २३ सप्टेंबर २०२६ रोजी पथकाला बकरी चोरी करणाऱ्या इसमाबाबत गोपनीय माहिती मिळाली. परतूर येथून चोरी झालेल्या आठ बकऱ्यांच्या प्रकरणात रईस सरदार शहा (वय २०, रा. सिरसगाव मंडप, ता. भोकरदन, जि. जालना) याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हसनाबाद परिसरात शोध घेऊन रईस शहा याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला चौकशीदरम्यान आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने परतूर येथून बकऱ्यांची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून बकरी चोरीसाठी वापरण्यात आलेली स्वीफ्ट कार व चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले.
यानंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने परतूर, बदनापूर, अंबड, चंदनझिरा, मंठा, सदर बाजार, मौजपुरी, तीर्थपुरी, पारध आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत बकरी चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यांतील अभिलेख तपासले असता या घटनांशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
१८ गुन्हे उघड
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीच्या चौकशीत पुढील १८ बकरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
परतूर पोलीस ठाणे गु.र.नं. 468/2026
बदनापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 414/2026
अंबड पोलीस ठाणे गु.र.नं. 526/2026
अंबड पोलीस ठाणे गु.र.नं. 543/2026
चंदनझिरा पोलीस ठाणे गु.र.नं. 471/2026
मौजपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 155/2026
अंबड पोलीस ठाणे गु.र.नं. 334/2026
मंठा पोलीस ठाणे गु.र.नं. 133/2026
सदर बाजार पोलीस ठाणे गु.र.नं. 166/2026
अंबड पोलीस ठाणे गु.र.नं. 173/2026
बदनापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 408/2025
सदर बाजार पोलीस ठाणे गु.र.नं. 555/2025
मौजपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 199/2025
जालुका जालना पोलीस ठाणे गु.र.नं. 411/2025
बदनापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 190/2025
मौजपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 131/2025
तीर्थपुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 94/2025
पारध पोलीस ठाणे गु.र.नं. 13/2025
या प्रकरणात सलीम सांडु शेख, रा. औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर हा आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. जेरबंद आरोपी रईस शहा याला पुढील तपासासाठी परतूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, इरशाद पटेल, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, बाबा गायकवाड, शिव एखंडे, घिरज भोसले आणि अशोक जाधवर यांनी केली.
बकरी चोरीच्या १८ गुन्ह्यांचा उलगडा झाल्याने जिल्ह्यातील जनावर चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. फरार आरोपीचा शोध तसेच चोरीच्या घटनांमधील इतर बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

Help
