जालना विधानसभा मतदारसंघात दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी
पालकमंत्री पंकजाताई मुंडे व आमदार अर्जुनराव खोतकर यांनी गोलापांगरी, गणेशनगर शिवारातील पिकांची केली पाहणी
जालना : जालना विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा नामदार पंकजाताई मुंडे आणि आमदार अर्जुनरावजी खोतकर यांनी आज दुपारी १ वाजता गोलापांगरी येथील गणेशनगर शिवारात भेट देत शेतकरी बांधवांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने जालना विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका शेती व्यवसायाला बसला आहे.
पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही पाहणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांचे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात आली.
पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत होणार असल्याचे यावेळी उपस्थितांकडून सांगण्यात आले.
बाबा मोरे,रमेश मोरे,अर्जुन मोरे,परमेश्वर मोरे, ऋषी आधे, नंदू शेळके, अर्जुन आधे, सुदर्शन देवडे, प्रभाकर ढवळे, जगनराव कावळे, दिपक कावळे, दिनेश कावळे, राजू कावळे,उद्धव कावळे, बाबा चांगुलपाय, नामदेव जऱ्हाड, सिद्धार्थ मोरे, पवन मोरे, प्रदीप शेळके, हरीभाऊ कावळे, बद्रीनाथ कावळे, परमेश्वर कावळे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव महिला भगिनी उपस्थित होते.

Help

