छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; सोमनाथ-जळगाव परिसरातील धक्कादायक प्रकार; पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासणी सुरू

गावात तणावाचे वातावरण, पोलीसाचा बंदोबस्त

Published By Dainik Shubh Prabhat
On

जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव मधील जळगाव येथे महादेव मंदिराच्या शेजारी बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला आहे.

मंगळवार दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पुतळ्याची विटंबना करणार्‍या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचा फौजफाटा तसेच सेवली पोलीस ठाण्याचे सपोनि. साबळे, मौजपुरी पोलीस ठाण्याचे पीएसआय तडवी, बीराजदार यांच्यासह पोलीस कर्मचारी भगवान खरात, संजय चव्हाण, प्रशांत म्हस्के, नितीन कोकणे, दादा हरणे, सदा खैरे, धोंडीराम वाघमारे, सतिष गोफणे, दिलीप गोडबोले, अंबादास दांडगे, सुनिल डोईफोडे, आणि कैलास शिवणकर यांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे.
या प्रकारामुळे गावातील वातावरण संवेदनशील झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. विटंबना करणार्‍या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीसांनी आरोपीचा कसुन शोध सुरु केला आहे.

प्रतिनिधी

संबंधित समाचार