नंदापूरमध्ये भारतमातेच्या मंदिराचा राष्ट्रभक्तीचा जागर
राष्ट्रगान, बौद्ध वंदना अन् शिवराय-डॉ. आंबेडकरांना अभिवादन; पहिल्या टप्प्याचे उत्साहात लोकार्पण
नंदापूर : राष्ट्रभक्ती, सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभावाचा अनोखा संगम सोमवारी नंदापूर येथे अनुभवायला मिळाला. गुरुवर्य ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भारतमाता मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. राष्ट्रगानाने झालेली कार्यक्रमाची सुरुवात, त्यानंतर झालेली बौद्ध वंदना आणि छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन या माध्यमातून सोहळ्याला सामाजिक ऐक्याचा व्यापक संदेश मिळाला.
लोकार्पण सोहळ्यापूर्वी प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, भजनी मंडळींचे सादरीकरण आणि उत्साही ग्रामस्थांच्या सहभागाने मिरवणूक भारतमाता मंदिर परिसरात पोहोचली. यावेळी ग्रामस्थांनी मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
भारत माता मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बौद्ध वंदना. राष्ट्रगानानंतर बौद्ध वंदना घेण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी त्यात सहभाग घेतला. विविध जाती-धर्मांतील नागरिकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे भारतमाता मंदिराच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमासोबतच सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून दिसून आला.
या वेळी मंदिराच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. मंदिरासाठी जमीन उपलब्ध करून देणारे, बांधकाम करणारे कामगार, शिल्पकार तसेच विविध माध्यमातून सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
‘मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’
आमदार अर्जुनराव खोतकर यांनी भारतमाता मंदिराच्या पुढील विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, ‘‘भगवान बाबांच्या हस्ते नंदापूरमध्ये भारत माता मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हा भाग्याचा क्षण आहे. आपल्या भागात भारतमातेचे मंदिर साकारत असल्याचा आनंद आहे. मंदिरासाठी तीर्थक्षेत्र नोंदणी, तीर्थक्षेत्र निधी आणि पर्यटन निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. परिसराच्या विकासासाठी बाबांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल.’’
व्यासपीठावर बौद्ध पंचशीलाचे नमन करण्यात आले, याचा सार्थ अभिमान असल्याचेही खोतकर यांनी सांगितले. भगवान बाबा यांच्या कार्यामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना असल्याचे नमूद करत भारतमाता मंदिराच्या माध्यमातून सर्व धर्मांचे नागरिक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकांनी मुलांमध्ये राष्ट्रप्रेम रुजवावे
कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्यामजी गोयल यांनी राष्ट्रप्रेम आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली पाहिजे. भारत हा आपल्या देशाला माता मानणारा देश आहे. नंदापूरमध्ये भारतमातेचे मंदिर साकारत आहे, ही आनंदाची आणि भाग्याची बाब आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
‘भगवान बाबांचे कार्य समाजाला दिशा देणारे’
माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण यांनी भगवान बाबा आनंदगडकर यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. विविध समाजघटकांना सोबत घेऊन चालणे, नागरिकांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणणे, अशा विविध माध्यमातून बाबांचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
समता आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याबरोबरच आनंदगड येथील आश्रमात विविध धर्मांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या मूर्ती उभारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
‘भारतमातेची सेवा करण्याची संधी मिळणार’
भास्करराव दानवे यांनी भारतमाता मंदिराच्या उभारणीबद्दल समाधान व्यक्त केले. देशात विविध देव-देवतांवर श्रद्धा असली तरी भारतमाता ही संकल्पना राष्ट्राशी जोडलेली आहे. नंदापूरमध्ये भारतमातेचे मंदिर साकारत असून तिची सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीराम-श्रीकृष्णांच्या कार्यातून सांस्कृतिक एकात्मतेचा संदर्भ
प्रमुख पाहुणे अभिजीत हरकरे यांनी भारतीय संस्कृतीतील श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कार्याचा संदर्भ देत देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेवर भाष्य केले. श्रीरामांनी भारतवर्षातील विविध भागांत प्रवास केला. विविध प्रदेशांमध्ये त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांच्या जीवनप्रवासातूनही भारतातील विविध प्रदेशांमधील सांस्कृतिक संबंध अधोरेखित होतात, असे त्यांनी सांगितले.
भगीरथाच्या प्रयत्नातून गंगा पृथ्वीवर अवतरल्याची श्रद्धा आहे. त्याच धर्तीवर भगवान बाबा आनंदगडकर यांनी नंदापूरमध्ये भारतमाता मंदिर साकारण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे हरकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
पुढील टप्प्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
भारत माता मंदिराच्या उभारणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. मंदिराच्या पुढील टप्प्यातील कामे पूर्ण करून मुख्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे. त्यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्याने नागरिक, भाविक आणि दानशूर व्यक्तींनी आपल्या क्षमतेनुसार सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
दहा हजार भाविकांसाठी अन्नदान
लोकार्पण सोहळ्यानिमित्त सुमारे दहा हजार भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते भगवान बाबांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांसाठी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविक म्हणून त्यांची ओळख असून विविध ठिकाणी अन्नदानाच्या माध्यमातून ते सेवा करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. भारतमाता मंदिराच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नंदापूरसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संत-महंत, मान्यवर आणि विविध समाजघटकांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. राष्ट्रभक्तीच्या भावनेसह सामाजिक समता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देत भारतमाता मंदिराच्या उभारणीच्या पुढील वाटचालीला या सोहळ्याने प्रारंभ झाला.

Help

